
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यागाच्या भावनेतून वाठोरे परिवार सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
राजगृह, आंबानगर, सांगवी बु. नांदेड येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि काशीनाथ वाठोरे निर्वाण दिनानिमित्त २० डिसेंबर रोजी दुसरे बहुजन कवी संमेलन संपन्न झाले. याप्रसंगी उदघाटक म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. सुप्रसिद्ध कवी व कथाकार अर्जून वाघमारे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, विजय वाठोरे हे साहित्यिक लेखक कवी व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते असून रेल्वेतील नोकरी सांभाळून सतत ते सामाजिक व साहित्यिक कार्यात अग्रेसर आहेत. या कार्यात त्यांचा संपूर्ण वाठोरे परिवार त्यागाच्या भावनेतून सहकार्य करीत आला आहे.
अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे जातीयवादी भावनेतून समाजात विष पेरण्याचे काम करीत आहेत. संविधान आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अपमान करीत आहेत. यांचा प्रतिकार करण्यासाठी बहुजन समाजाने आपसातील मतभेद विसरुन एक व्हावे असे आवाहनही शेवटी इंजि. देगलूरकर यांनी केले.
मराठा सेवा संघाचे शिवाजी माने (उमरखेड) यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. साहित्यिक प्रा. डाॅ. राजेंद्र गोणारकर यांचा यावेळी समाजशब्द पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गीतलेखन गायन प्रबोधन क्षेत्रासाठी समाजस्वर पुरस्कार देऊन शाहिर कैलिस राऊत (हदगाव) यांचाही सन्मान करण्यात आला. नांदेड महानगर पालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्ती झालेले गौतम कवडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भालचंद्र वाठोरे यांनी तर सूत्रसंचलन महेंद्र नरवाडे यांनी केले.
निराबाई गोखले, सरस्वताबाई गोखले, जिजाबाई गोखले, हिराबाई वाठोरे, भारत वाठोरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयमाला वाठोरे, विजय वाठोरे, मनीषा वाठोरे, गणेश वाठोरे, भगवान वाठोरे, राजकुमार कवडे आदींनी परिश्रम घेतले.
कवी संमेलनात चाळीसहून अधिक कवींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रुपाली वागरे, अनुरत्न वाघमारे, धोंडीबा मोरे, प्रा. गजानन सोनोने (अमरावती), बाबुराव पाईकराव (डोंगरकडा), नम्रता खिल्लारे (कळमनुरी), अशोक वसाटे (किनवट) आदींनी उत्कृष्ट कविता सादर केल्या. कु. सोनल गच्चे आणि कु. स्पर्शिका सोनाळे यांनी नृत्य सादर केले.