हिमायतनगर येथे आदिवासी समाजाकडून रास्ता रोको आंदोलन..
(शंकर बरडे )महाराष्ट्रातील आदिवासींचे अनुसूचित जमात या प्रवर्गातून धनगर समाज अथवा इतर कोणत्याही समाजास कोणत्याही प्रकारे आरक्षण देण्यात येऊ नये, अशी मागणी करत आदिवासी हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बांधवाकडून नांदेड -किनवट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रेल्वे स्टेशन पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन केले.
वास्तविक आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था तसेच टीआयएसएस या खासगी संस्थेने तसेच सर्वोच्च न्यायालयाने धनगर समाज हा महाराष्ट्रातील अनुसूचित प्रवर्गासाठी असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, रूढी-पंरपरा, राहणीमान, बोलीभाषा व इतर निकष आहेत ते पूर्ण करू शकत नसल्याने या समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश होऊ शकत नाही, असा अहवाल व निर्णय यापूर्वी दिला आहे.
तरीदेखील सत्तेतील व विरोधी नेते मंडळी त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाचे गाजर दाखवत आहेत.
यातून खऱ्या आदिवासींना डिवचण्याचे काम महाराष्ट्र सरकार व भाजपचे काही नेते, प्रवक्ते करत आहेत याचा संपूर्ण महाराष्ट्रातील विविध संघटना निषेध करत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात मणिपूरप्रमाणे दोन समाजांत आरक्षणाच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा फाजील प्रयत्न सत्ताधारी पक्षांतर्फे होत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. उद्या याप्रश्नी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशाराही दिला.