सरपंच संतोष देशमुख हत्त्या व सोमनाथ सुर्यवंशी मृत्यु प्रकरणी त्वरीत न्याय हवा..
संतोष आंबेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी.
सरपंच संतोष देशमुख हत्त्या व सोमनाथ सुर्यवंशी मृत्यु प्रकरणी हिमायतनगर तालुक्यातील जनतेने आपला रोष व्यक्त केला आहे. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभाग,जिल्हाउपाध्यक्ष संतोष आंबेकर यांच्या नेतृत्वात हिमायतनगर तालुक्यातील शिष्टमंडळाने तहसिल कार्यालय हिमायतनगर, नायब तहसिलदार श्री.ताडेवाड साहेब यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री श्री.देवेद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या क्रुरपणे हत्त्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी फरार झाले. त्यानंतर आरोपी हे मंत्रीमंडळातील एका मंत्र्याच्या निकटचे आहेत असा आरोप सर्वत्र होतोय. त्यामुळे सरकारने खुप काळजीपुर्वक या प्रकरणी पावलं उचलणे गरजेचे आहे. कारण या मंत्र्यांकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. असा आरोप नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभाग,जिल्हाउपाध्यक्ष संतोष आंबेकर यांनी या निवेदनात केला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊन सदरील प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करुन आरोपीला कठोर शिक्षा त्वरीत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच परभणी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी असलेल्या संविधान शिल्पाची विटंबना झाली त्यानंतर संविधान प्रेमी तथा आंबेडकरी समाजाने संविधानिक मार्गाने आंदोलन करताना पोलीसांनी अताताईपणा करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यात बरेच जण जखमी झाले तसेच आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी एक कायद्याचे शिक्षण घेणारा संविधान अभ्यासक सोमनाथ सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला.याबद्द्ल पोलीस प्रशासनाचा आणि आपल्या गृह खात्याचा काँग्रेस पक्ष निषेध व्यक्त करत आहे. या प्रकरणी आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे परत घ्यावे, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभाग, नांदेड यांच्या वतीने करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी कैलास सुर्यवंशी, संतोष सुर्यवंशी,रमेश सुर्यवंशी, आनंद सुर्यवंशी आदी उपस्थित होते.