ऑगस्टच्या या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा कंपनीकडून जमा होणार रक्कम..
नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 119 कोटी रुपये जमा.
नांदेड दिं.१० ऑगस्ट : प्रधानमंत्री पिक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम 20 ऑगस्ट पर्यंत जमा केली जाणार आहे. आतापर्यंत 119 कोटी जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नसेल त्यांनी 20 ऑगस्ट नंतर तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना हा लाभ दिला जात आहे.त्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये थेट नुकसान भरपाई वितरित केली जात आहे.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन बैठकीमध्ये 20 ऑगस्ट पर्यंत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जमा करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार विमा कंपन्यांनी कारवाई सुरू केली आहे. 2 लक्ष 54 हजार 333 शेतकरी नुकसान भरपाई साठी विमा कंपनीकडून लाभार्थी ठरले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 178.61 कोटी रुपये मंजूर झाले आहे. 20 ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभाची रक्कम मिळावी असे निर्देशित करण्यात आले आहे.
दिं 10 ऑगस्टला 1 लक्ष 41 हजार 575 शेतकऱ्यांच्या खात्यावर 119.2 कोटी रक्कम जमा झाली आहे. शेतकऱ्यांनी आपले खाते तपासून घ्यावे. जर विम्याची रक्कम आपल्या खात्यात जमा झाली नसेल तर मात्र 20 ऑगस्ट पर्यंत वाट बघावी. 20 ऑगस्टपर्यंत ही विम्याची रक्कम खात्यावर जमा नसेल झाली तर विमा कंपनीच्या तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ साहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.