नदीपात्रातील पुरस्थितीमुळे एक दिवस पाणी पुरवठा राहणार बंद.
नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासुन मुसळधार पाऊस सुरु असुन जनजिवन विस्कळीत झाले आहे. नांदेड शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात प्रचंड पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडुन मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गढुळ पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाणी शुध्दीकरण करणे कठीण होत आहे. तसेच सदरील गढुळ पाण्यामुळे महापालिकेच्या पंपींग स्टेशन व जलशुध्दीकरण केंद्रावरील पंपींग मशिनरी यामध्ये बिघाड होण्याची शक्यता असल्याने शहरास होणारा पाणी पुरवठा एक दिवस बंद राहणार आहे.
नदीपात्रातील पाण्याची आवक कमी होऊन पाण्याचा विसर्ग कमी झाल्यावर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. तरी शहरातील नागरीकांनी याची नोंद घेऊन पाणी काटकसरीने वापरुन, पाण्याचा अपव्यय टाळुन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.