डॉ.शिवराज शिंदे लिखित ‘परिवर्तनवादी शाहीर’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन..
हदगाव तालुक्यातील उंचेगावचे भूमिपुत्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित कला विभागात कार्यरत असलेले डॉ. शिवराज शिंदे यांच्या ‘परिवर्तनवादी शाहीर’ या पुस्तकाचे प्रकाशन ख्यातनाम साहित्यिक, लेखक डॉ. माधव जाधव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्या हस्ते दि.११ सप्टेंबर रोजी करण्यात आले. डॉ. माधव जाधव यांनी पुस्तकावर भाष्य करताना म्हटले की, “परिवर्तन हे शास्तही आणि कलाही आहे. याचा सुरेल संगम आपल्याला या पुस्तकाच्या रूपाने पाहायला मिळतो.” समाज परिवर्तनासाठी एका शाहिराची तळमळ काय असते याची मांडणी त्यांनी यावेळी केली. तर कोणताही लेखक एखादे पुस्तक लिहितो म्हणजे तो एक आपत्य जन्माला घालत असल्याचे मत डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी व्यक्त केले. तसेच शिवाजी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. दत्तराव शिंदे हे होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत पुस्तकाची भूमिका मांडताना शाहीर हा फक्त शौर्यगाथा किंवा गोडवे गाणारा नसतो तर, तो प्रबोधनात्मक परिवर्तन करणारा असल्याचे मत डॉ. शिवराज शिंदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शंकर माने यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवशंकर शिंदे यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी संजय कल्याणकर, राजू पाटील, शाहीर गजानन जाधव, जयदीप पाटील, राजू पाटील हडसनीकर, धोंडिबा सूर्यवंशी, प्रा. राजेश्वर राऊत, सचिन जाधव, श्रीकृष्ण माने, संभाजी जाधव, कृष्णा काळे, प्रमोद पतंगे यांच्याबरोबर अनेकजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सुदर्शन शिंदे, सत्यसागर वाठोरे, हर्षद शिंदे यांनी केले.